Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हामूल शहरातील मालधक्यास नागरिकांचा तीव्र विरोध. पत्रकार परिषदेतून माहिती.

मूल शहरातील मालधक्यास नागरिकांचा तीव्र विरोध. पत्रकार परिषदेतून माहिती.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : अलीकडे वर्तमानपत्रांमधून अशी माहिती समोर आली आहे की माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २५,००० विद्यार्थ्यांचे निवेदन देऊन मूल शहरात मालधक्का सुरू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन करण्यात आली आहे.
मूल शहरात मालधक्का होऊ नये. तसेच शहर पर्यावरणीय व अपघाताच्या दृष्टीने सुरक्षित राहावे. यासाठी तालुक्यातील जनता ठामपणे आग्रही आहे. चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा आहे या कारणावरून मूल शहरात मालधक्का सुरू करण्याची मागणी करणे ही पूर्णपणे तर्कहीन भूमिका असून. या मागणीस आमचा स्पष्ट विरोध आहे.
मुळात शोभाताई फडणवीस व पांडुरंगजी आंबटकर यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या सह्या न घेता. ग्रामीण भागातील नागरिकांकडून वाघांच्या हल्ल्यांवर बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी घेतलेल्या सह्यांचा वापर या मालधक्का मागणीसाठी केला आहे. ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांची दिशाभूल करणारी असून अत्यंत गंभीर आहे.
सन २०२३ मध्ये सुरजागड येथील आयरन खनिजाची वाहतूक चांदा-फोर्ट गोंदिया रेल्वे मार्गावरून करण्यासाठी मूल शहरात मालधक्का प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी रेल्वे विभागाने काम सुरूही केले होते. परंतु या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यभागातून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक वाहतूक होणार असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती होती. तसेच मूल शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मैदान नष्ट होण्याची शक्यता होती.
या विरोधात मूल तहसीलमध्ये ५,००० हून अधिक विद्यार्थी, व्यापारी व नागरिकांनी मोर्चा काढला होता. गुड मॉर्निंग ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदी सर्वच पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. या विभागाचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करून मूल शहरातील मालधक्का प्रस्ताव रद्द करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.
यानंतर रेल्वे विभागाने मूल शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर केळझर येथे त्याच रेल्वे मार्गावर मालधक्का सुरू केला. सध्या सुरजागड येथील आयरन खनिजाची वाहतूक या मार्गाने सुरू आहे. त्यामुळे मूल शहरात नव्याने वेगळ्या मालधक्क्याची कोणतीही आवश्यकता नाही.
असे असताना, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने छापील निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनातील बहुतांश मजकूर वाघांच्या समस्येवर आधारित असून, मध्येच वाघांचा जिल्हा असल्यामुळे मूल शहरात मालधक्का करण्यात यावा अशी एक ओळ समाविष्ट करण्यात आली आहे. वाघांच्या भीतीचा आधार घेऊन घेतलेल्या सह्यांचा वापर या मागणीसाठी करण्यात आला असून, ही बाब मुख्यमंत्री यांची फसवणूक करणारी आहे.
मूल शहर हे शांत, सुरक्षित व पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ शहर आहे. मात्र येथे मालधक्का सुरू झाल्यास संपूर्ण शहर प्रदूषणामुळे बाधित होण्याची भीती आहे. अपघातांची संख्या वाढणे, समाजकंटकांचा त्रास वाढणे, दारू, गांजा, अफू यांसारख्या व्यसनांचे प्रमाण वाढणे तसेच महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामुळेच मूल नगर परिषदेने विशेष सभा घेऊन शहरात मालधक्का होऊ नये. यासाठी एकमताने ठराव मंजूर केला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
या विभागाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन देण्यात आले असून, त्यांनी मूल शहरात मालधक्का होऊ नये. यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल परिसर हा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित भाग आहे. येथे कोणतीही खाण नसल्यामुळे मालधक्का उभारण्याची गरज नाही. त्याच रेल्वे मार्गाच्या अल्प अंतरावर आधीच मालधक्का उपलब्ध असताना तसेच रेल्वे प्रशासन किंवा कोणत्याही कंपनीकडून मागणी नसताना बळजबरीने मूल शहरात मालधक्का उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रयत्नांना मूल तालुक्यातील जनता ठामपणे विरोध करणार आहे. शासन व रेल्वे प्रशासनाने मूलवासीयांच्या जीवाशी खेळू नये. तसेच हा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा. अशी आमची ठाम मागणी आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. दरम्यान विजय सिद्धावार, जीवन कोणतमवार, एकता समर्थ नगराध्यक्ष, प्रविण समर्थ सभापती, अनिल मोगरे, अँड. प्रणव वैरागडे, प्रा. प्रशांत वासाडे,अमोल बचुवार, विवेक मुत्यालवार नगरसेवक, डॉ. दिनेश वऱ्हाडे, प्रशांत गटूवार, कैलाश चलाख, सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, श्रीकांत बुंभकावार, भास्कर खोब्रागडे, राहुल प्रेमलवार, दिनेश गोयल, महेश गाजलवार, प्राचार्य अविनाश गारपलीवार, नितीन येद्रोजवार , साई चिमडॅलवार, संतोष पालादुरकर, भोजराज गोवर्धन, ॲड. आश्विन पालीकर, दुर्वास घोंगडे, कुमोदिनी भोयर, संजय भुसारी उपस्थित होते.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!