Thursday, May 7, 2026
Homeआपला जिल्हाचंद्रपूरात सहा मे ला ‘मोगरा फुलला’ च्या सुरेल सोहळ्याचे आयोजन.

चंद्रपूरात सहा मे ला ‘मोगरा फुलला’ च्या सुरेल सोहळ्याचे आयोजन.

 

चंद्रपूर  ( मुक्तिवाद सेवा ) – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘मोगरा फुलला’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह, सिव्हिल लाईन्स, जटपुरा गेट रोड, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून राज्यभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर केला जात असून, त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र, त्यांच्या अभंगांमधील तत्त्वज्ञान आणि समाजाला दिलेला मानवतेचा संदेश प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे हे आपल्या प्रभावी आणि ओघवत्या निरूपणातून संतांच्या जीवनकार्याचा वेध घेणार आहेत, तर गायिका सन्मिता शिंदे आपल्या सुरेल आवाजातून अभंग व भावगीतांची मेजवानी सादर करून वातावरण भक्तिमय करणार आहेत.

आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत माणूस आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक मुळांपासून दूर जात असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ‘मोगरा फुलला’सारखे कार्यक्रम समाजाला मूल्यांची, समतेची आणि बंधुभावाची जाणीव करून देतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला सर्वधर्मसमभाव, एकात्मता आणि मानवतेचा संदेश आजच्या समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतो. तसेच, आधुनिकतेच्या प्रभावामुळे पारंपरिक संतसाहित्यापासून दूर जात असलेल्या तरुण पिढीपर्यंत हे विचार पोहोचवण्याचे कार्य अशा कार्यक्रमांद्वारे प्रभावीपणे केले जाते. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक नव्हे, तर समाजप्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

या सुरेल आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!