चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : चंद्रपूर वन कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर च्या व्यवस्थापक मंडळाची निवडणूक रविवार, दिनांक 04/02/2024 ला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरची इमारत समाधान पूर्ती बाजारच्या बाजुला जटपूरा गेट चंद्रपूर येथे घेण्यात आली. या निवडणूकीत प्रामुख्याने प्रगती पॅनल व परीवर्तन पॅनल या दोन पॅनलचा समावेश झाला होता. त्यात संतोष अतकारे यांच्या प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांचा चौथ्यांदा एकतर्फी विजय झाला असून या नवनियुक्त संचालक मंडळात संतोष अतकारे, योगिता मडावी, प्रिती मुधोळकर हे बिनविरोध निवडून आले तर योगेश धकाते, दर्शन गहुकर, दिपक हिवरे, राजेश पिंपळकर, अखिल राईंचवार, हर्षपाल रामटेके, धिरज दहेगांवकर, सचिन साळवे या 11 नवनियुक्त संचालकांचा समावेश आहे.
पतसंस्थेच्या विकासात्मक व धोरणात्मक बाजुला अनुसरुन सहकार क्षेत्रातील मोलाचे पाऊल प्रगती पॅनलच्या गटाने उचलले आहे. मागील पाच वर्षाचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, चंद्रपूर वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आर्थिक उलाढाल, हाती घेतलेले नवनविन उपक्रम व पतसंस्थेच्या विकासासाठी सुक्ष्म नियोजन करुन वन कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिण विकासास पोषक वातावरण निर्माण करण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आज स्थितीत पतसंस्थेची वार्षिक उलाढाल भक्कम असून या उलाढालीबद्दल सभासदांचे सकारात्मक प्रयत्न आज फळास आलेले दिसून येत आहे.
व्यवस्थापक मंडळाच्या निवडणूकीचे महत्त्वाचे कार्य सन्माननीय सभासदांच्या मदतीने आणि लाखो शुभेच्छांनी पूर्णत्वास आले आहे. पुढील पाच वर्षात सभासद बंधूच्या मदतीने या पतसंस्थेचा नावलौकीक जिल्हा पातळीवरच नव्हे तर राज्य पातळीवर नेण्याचा नवनियुक्त संचालक मंडळाचा मानस आहे. असे मनोगत प्रगती पॅनलच्या वतीने नवनियुक्त संचालक संतोष अतकारे यांनी व्यक्त करुन हा विजय पूर्ण सभासदांचा आहे. व सभासदांनी विश्वासाने व स्नेहाने आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासह पतसंस्थेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी प्रदान केली. त्याबद्दल संस्थेच्या सभासदांचे मनापासून आभार मानले.


