चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : चंद्रपूर जिल्हा दाट अरण्यांनी वेढलेला असून, येथे गेल्या अनेक वर्षांपासून मानव–वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. मानवी जीवितहानी आणि पिकांचे नुकसान यामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे या समस्येचे तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपाय शोधणे अत्यावश्यक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ आणि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी BIT अभियांत्रिकी महाविद्यालय, बल्लारपूर येथे हॅकथॉन स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धक IoT, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML) आणि संगणक विज्ञान व संप्रेषण (CSC) तंत्रज्ञानांचा वापर करून मानव–वन्यजीव संघर्ष निवारण व संबंधित समस्यांवर अभिनव उपाय सादर करू शकतील.
स्पर्धा दोन विभागांत घेतली जाईल:
1. मानवी सुरक्षा – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानव–वन्यजीव संघर्ष कमी करणे.
2. उपजीविकेचे संरक्षण आणि वन्यजीवांचे निरीक्षण
क्षेत्र (Domain): IoT, AI/ML, CSE आणि संबंधित तंत्रज्ञान
१८ ते ३० वयोगटातील ३ ते ५ सदस्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघाने आपली पीपीटी ११ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागातील विजेत्या संघाला ₹ ५०,००० चे रोख पारितोषिक देण्यात येईल. तसेच निवडलेल्या प्रकल्पांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या साहाय्याने पुढील तंत्रज्ञान विकासाची संधी दिली जाईल.
प्रत्येक संघाकडून ₹५०० नोंदणी शुल्क आकारले जाईल. या स्पर्धेत सहभागींना उद्योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन, जागतिक स्तरावरील नेटवर्किंग आणि अभिनव कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल.
या हॅकथॉन स्पर्धेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व संवर्धन आणि सहजीवनासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधण्याच्या कार्यात सहभागी व्हावे. असे आवाहन क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी केले आहे.
बलारपुरात चौदा आणि पंधरा तारखेला हॅकथॉन स्पर्धा. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा संयुक्त उपक्रम.
संपादक
जयपाल गेडाम


